About Us
राष्ट्रीय सेवा योजनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवेबाबत जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पहिल्या शिक्षण आयोगाने (१९५०) राष्ट्रीय सेवेचा विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी पद्धतीने अंतर्भाव करण्यात यावा अशी शिफारस केली होती, त्यानंतर तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सुचनेनुसार डॉ. सी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली व विद्यार्थ्यांसाठी पदवीपूर्व सक्तीच्या राष्ट्रीय सेवेसंबंधी योजना तयार करण्यास सांगण्यात आले. प्रा. के. जी. सैइद्दीन, ज्यांनी अनेक देशांमधील युवकांच्या राष्ट्रीय सेवेसंबंधी अभ्यास केला होता, त्यांनी स्वयंसेवी पद्धतीने राष्ट्रीय सेवा सुरू करावी अशी शिफारस केली. अशाच पद्धतीची शिफारस डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या शिक्षण आयोगानेही केली.
सन १९६७ मध्ये झालेल्या कुलगुरुंच्या परिषदेमध्ये या शिफारशींचे स्वागत करून अशी सूचना करण्यात आली की, या योजनेचा सविस्तर विचार करण्यासाठी कुलगुरुंची विशेष समिती नेमण्यात यावी. त्याचा परिणाम म्हणून चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये योजना आयोगाने राष्ट्रीय सेवा योजनेसाठी पाच कोटी रुपये अनुदान मंजूर केले. ज्यायोगे निवडक महाविद्यालये व इतर संस्थांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रा. से. यो. हा अग्रीम प्रकल्प सूरू करण्यात आला. या शिफारशींना अनुलक्षून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १९६७-७० मध्ये राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. १९६९ हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्म शताब्दी वर्ष होते. गांधीजींनी राष्ट्रीय सेवा हाच धर्म मानला होता, म्हणून त्याच वर्षी राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आली.
विद्यार्थ्यांचा या योजनेस अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. सन १९६९ मध्ये ४०,००० विद्यार्थ्यांनी सुरू झालेल्या या योजनेमध्ये वर्षानुवर्षे वाढ होऊन सद्या ८ लाखांवर विद्यार्थी संख्या पोहचली आहे. आता या योजनेचा विस्तार सर्व राज्यांमध्ये व देशातील सर्व विद्यापीठांमध्ये झालेला आहे. विद्यार्थी, शिक्षक, आई-वडील, पालक, शासकीय अधिकारी, शासन, विद्यापीठे, महाविद्यालये आणि सामान्य नागरिकांनीही राष्ट्रीय सेवा योजनेची गरज व महत्त्व मान्य केले आहे.
या योजनेमुळे युवकांमध्ये जीवनाच्या वास्तवतेची जाणिव निर्माण झाली आहे. त्यामुळे ते समाजातील प्रश्न चांगल्याप्रकारे समजावून घेऊन त्यांचे विश्लेषण करू लागले आहेत. अशा प्रकारे राष्ट्रीय सेवा योजना शिक्षणास समाजाभिमुख बनविण्याचा एक निश्चित प्रयत्न करीत आहे. या योजनेद्वारे अत्यंत चांगल्या प्रकारची प्रशंसनीय व अनुकरणीय कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे या योजनेविषयी समाजामध्ये आदर व विश्वास निर्माण झाला आहे. १९७६- ७७ पासून विविध विषयांवरील विशेष श्रमसंस्कार शिबिरे म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्वात मोठे योगदान आहे.
बोध वाक्य :
राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्य 'NOT ME, BUT YOU' म्हणजेच 'माझ्यासाठी नव्हे, आपणांसाठी' असे आहे. हे वाक्य म्हणजे लोकशाही जीवन शैलीचा गाभा आहे आणि निस्वार्थी सेवेची गरज व्यक्त करते, तसेच आपण इतरांच्या मतांचा आदर करावा असे सांगते. तसेच इतर लोकांचा सहानभुतीने विचार करावयास प्रवृत्त करते. अंतिमतः कोणत्याही व्यक्तीचा विकास हा तेथील समाजाच्या सर्वकष विकासावर अवलंबून असतो. त्यामुळे या बोधवाक्याची अनुभूती राष्ट्रीय सेवा योजनेच्या दैनंदिन कार्यक्रमांमधून यावयास हवी.
बोध चिन्ह
राष्ट्रीय योजनेचे बोध चिन्ह हे कोणार्क येथील सूर्यमंदिराच्या रथचक्राच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. या सूर्य मंदिराची प्रचंड चाके सृजनशीलता, संवर्धन व मुक्तीचे प्रतिकात्मक रूपाने चित्रण करतात व वेळ आणि काळ या संदर्भात जीवनाची गतिमानता दर्शवितात. चिन्हाची रचना जीवनातील विकास प्रक्रिया ध्वनीत करते. ते सातत्य व बदलाचे प्रतीक असून राष्ट्रीय सेवा योजना समाज परिवर्तन आणि उद्धारासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील असे सूचित करते. समाज सेवेची वेगवेगळी कामे करीत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हा बिल्ला लावतात. कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या रथाला २४ चाके आहेत ते दिवसातील २४ तासांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक चाकास ८ आरे आहेत ते दिवसातील ८ प्रहर दर्शवितात. जो कोणी हा बिल्ला लावतो त्यास हा बिल्ला जाणीव करून देतो की दिवसातील २४ तास किंवा ८ प्रहर तो राष्ट्रीय सेवेसाठी तत्पर आहे. बिल्ल्यातील लाल रंग स्वयंसेवकांमधील ज्वलंतपणा, क्रियाशीलता व उत्साहाचे प्रतीक आहे. त्यामधील गर्द निळा रंग ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. या ब्रह्मांडामध्ये राष्ट्रीय सेवा योजना हा एक अत्यंत लहान भाग आहे की जो मानवाच्या कल्याणासाठी आपला वाटा उचलण्यास सदैव तयार आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेविषयीच्या महत्त्वाच्या बाबी
- एन. एस. एस. चा अर्थ - राष्ट्रीय सेवा योजना
- राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप - केंद्रिय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय पुरस्कृत पदवी, पदव्युत्तर व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी समाज सेवेसाठीची योजना.
- राष्ट्रीय सेवा योजनेचा जन्म - महात्मा गांधी जन्म शताब्दी वर्ष सप्टेंबर १९६९ तसेच चौथ्या पंचवार्षिक योजना - १९६९-७४ मध्ये
- राष्ट्रीय सेवा योजनेचे बोध वाक्य - 'माझ्यासाठी नव्हे, आपणांसाठी'
- राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय - लोकसेवेतून शिक्षण आणि शिक्षणातून लोकसेवाराष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक पदवी, पदव्युत्तर व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी
- राष्ट्रीय सेवा योजनेचे कर्तव्य - आपल्या नियमित शिक्षणक्रमासोबत सलग दोन वर्षे, दरवर्षी १२० तास याप्रमाणे, उपक्रमांमध्ये भाग घेणे आणि एका विशेष शिबिरामध्ये सहभागी होणे.
- राष्ट्रीय सेवा योजनेचा अभिमान - राष्ट्रीय सेवा योजनेचा बिल्ला व प्रमाणपत्र जे दोन वर्षे व १ विशेष शिबीर पूर्ण केल्यानंतर देण्यात येते.
- राष्ट्रीय सेवा योजनेमधील प्रमुख घटक - राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रक्रियेमध्ये चार महत्त्वाचे घटक विद्यार्थी, शिक्षक, समाज आणि कार्यक्रम.
- राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम - द्विस्तरीय कार्यक्रम : नियमित कार्यक्रम आणि विशेष शिबीर राष्ट्रीय सेवा योजनेमधील कार्यक्रमांत लवचिकता आहे. विद्यापीठाच्या सल्ल्याने कोणताही समाजोपयोगी कार्यक्रम परिस्थितीनुरूप घेता येतो..
- राष्ट्रीय सेवा योजनेची विविध अंगे - नियमित कार्यक्रम किंवा विशेष शिबिरादरम्यान घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची चार अंगे आहेत :
अ) संस्थात्मक कार्य
ब) संस्थांतर्गत प्रकल्प
क) ग्रामीण प्रकल्प
ड) शहरी प्रकल्प
स्थानिक गरज व अग्रक्रमानुसार या पैकी सर्व किंवा कोणतेही निवडक कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटमार्फत घेण्यास मुभा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा कल व आवडीनुसारही कार्यक्रम घेता येतात.
या कार्यक्रमांचे हेतू खालीलप्रमाणे असावेत:
शिक्षण सद्य परिस्थितीशी जास्तीत जास्त सुसंगत बनविणे की जेणेकरून ते समाजाच्या गरजा पूर्ण करू शकेल आणि विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थ्यांना ग्रामीण परिस्थितीतील वास्तवास सामोरे जाण्यासाठी पूरक ठरेल.
विद्यार्थ्यांना नियोजन व अंमलबजावणीमध्ये आपली भूमिका बजावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे. असे प्रकल्प म्हणजे केवळ कायमस्वरूपी ग्रामीण भागातील साधने तयार करणे किंवा शहरी भागातील झोपडपट्टी विकास करणे नसून आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाचे उन्नयन करणे होय.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थेतर घटकांना प्रौढांच्याबरोबर एकत्र येऊन काम करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यायोगे त्यांच्यामध्ये सामाजिक जाणिव जागृती वृद्धींगत करणे.
शिबिरार्थीना विद्यार्थी तसेच स्थानिक युवक (ग्रामीण व शहरी) जास्तीत जास्त जवळून विकास प्रकल्पामध्ये सामावून घेण्याच्या हेतूने तसेच शिबिरामधून निर्माण झालेल्या इतर योजनांची देखभाल करण्यासाठी त्यांच्यातील सुप्त गुण जाणून घेऊन त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास घडवून आणणे.
युवकांना राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यास तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी सहजीवन व सहकारी कृतीतून प्रोत्साहित करणे.१२. राष्ट्रीय सेवा योजनेचे सध्याचे लक्ष संपूर्ण भारतात १९ लाख आणि संपूर्ण महाराष्ट्रात ३ लाख २० हजार विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये नोंदणी करण्यात आली आहे.
.
- राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये प्रवेश कसा मिळतो? - आपल्या महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे.
- राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये नोंदणी झाल्यानंतर - महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आपणास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम कसे राबवावेत या संबंधी मार्गदर्शन करतील. तुम्हाला वेळोवेळी प्रबोधन करण्यात येईल.
- राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांवरील आर्थिक भार - राष्ट्रीय सेवा योजनेचा भाग म्हणून घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमासाठी स्वयंसेवकांना कोणताही आर्थिक भार सोसावा लागत नाही.
- राष्ट्रीय सेवा योजनेचे संघटन व व्यवस्थापन - केंद्रीय, राज्यस्तरीय आणि विद्यापीठ / महाविद्यालयीन स्तर अशी त्रिस्तरीय व्यवस्था आहे. महाविद्यालयीन युनिट हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांचा केंद्रबिंदू आहे.
- राष्ट्रीय सेवा योजनेचे आर्थिक घटक - केंद्र व राज्य सरकार मिळून ७ : ५ या प्रमाणात सर्व खर्च उचलतात.
- इतर युवा कार्यक्रम: - सद्या, राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने भारत सरकारच्या पूर्ण सहाय्याने राष्ट्रीय एकात्मता शिबीर, शौर्य, युवक प्रदर्शन, युवा मंडळांना सहाय्य या पद्धतीने कार्यक्रम राबविण्यात येतात..
डॉ. डी. एल. काशिद-पाटील
कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना विभाग